Shivsena UBT Meeting | आज मातोश्रीवर (Matoshree) (22 मे) मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधान परिषद निवडणूकीच्या (Legislative Council Elections) पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मातोश्रीवरील या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच मातोश्रीवर झालेली आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ही बैठक मराठवाड्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) बैठक पार पडली.
हेही वाचा – मातोश्रीवर मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, पक्षफुटीला रोख बसणार?
कोणत्या खासदाराने बैठकीला मारली दांडी? नेमकं कारण काय?
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे काही खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कारण काही दिवसांपूर्वी हिंगोलीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश आष्टीकर (Nagesh Ashtikar) आणि यवतमाळ-वाशिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख (Sanjay Deshmukh) हे शिंदे गटाच्या एका डिनरला उपस्थित राहिले होते. तसेच खासदार संजय दिना पाटील (Sanjay Patil) आणि परभणीचे खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) हे देखील शिंदेच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित केली होती.
आजच्या या बैठकीसाठी हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर हे मातोश्रीवर दाखल झाले होते. मात्र परभणीचे खासदार संजय जाधव यांनी या बैठकीला दांडी मारली होती. त्यामुळे संजय जाधव हे ठाकरेंची साथ सोडून शिंदेंना साथ देणार का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. संजय जाधवांच्या अनुपस्थितीमुळे उद्धव ठाकरेंच्या चिंतेत वाढ झाली आहे.
उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार?
काही दिवसांपूर्वी संजय जाधव यांनी ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याचे संकेत दिले होते. एका सभेत बोलताना संजय जाधव म्हणाले होते की, मी माझ्या पक्षासोबत प्रामाणिक आहे. मात्र, जेव्हा काही राजकीय परिस्थिती निर्माण होईल तेव्हा मी उद्याचं आज काही सांगू शकत नाही, असं भुवया उंचवणारं वक्तव्य जाधव यांनी केलं होतं. अशातच आजच्या मातोश्रीवरील बैठकीत संजय जाधव हे गैरहजर राहिल्याने ते खरंच ठाकरेंची साथ सोडणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दुसरीकडे, उद्धव ठाकरेंसोबत बैठक पार पडल्यानंतर नागेश आष्टीकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांनी आष्टीकरांना शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’बाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, ते ऑपरेशन टायगर नाही तर ते स्लो ऑपरेशन टायगर आहे. कारण मागील दोन वर्षांपासून ऑपरेशन टायगरची फक्त चर्चाच सुरू आहे. बाकी कुणाच्याही मनात काही नाही. आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलो होतो पण त्यांनी देखील याबाबत काही विषय काढला नव्हता. या फक्त माध्यमांनी पसरवलेल्या चर्चा आहेत, असं आष्टेकरांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आगामी निवडणुका आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे गटाने ‘ऑपरेशन टायगर’ असं नाव देत गुप्त रणनीती आखली असल्याचं म्हटलं जात आहे. शिंदेंच्या या ऑपरेशन टायगरचं मुख्य उदिष्ट संख्याबळ वाढवणे हे आहे. त्यासाठी ठाकरे गटातील खासदारांना आपल्या पक्षात वळवण्याची रणनीती शिंदे गट आखत असल्याचं म्हटलं जात आहे.












