Rajinikanth reaction after Vijay success : तमिळ चित्रपटसृष्टीतील दोन महाकाय व्यक्तिमत्त्व एक म्हणजे दक्षिणेचा थलैवा रजनीकांत (Rajnikant)आणि दुसरे म्हणजे आज तमिळनाडूच्या सत्तेच्या शिखरावर पोहोचलेले थलपती विजय (Josef Vijay). गेल्या काही दिवसांपासून तमिळनाडूच्या राजकारणात (Tamilnadu Politics), चित्रपटसृष्टीत आणि सोशल मीडियावर एकच कुजबुज सुरू होती. विजय यांच्या अभूतपूर्व राजकीय यशामुळे रजनीकांत नाराज आहेत का? विजय मुख्यमंत्री झाल्यानंतरही रजनीकांत यांनी त्यांचं अभिनंदन का? केलं नाही. आणि सर्वात मोठा प्रश्न दक्षिणेच्या सुपरस्टारला नव्या राजकीय सुपरस्टारचा मत्सर वाटतोय का? या सर्व चर्चांनी इतकं जोर धरलं की अखेर स्वतः रजनीकांत यांनाच समोर येऊन या अफवांना उत्तर द्यावं लागलं.
आज सकाळी पोएस गार्डनमधील रजनीक त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांची गर्दी उसळली होती. कॅमेरे सज्ज होते, मायक्रोफोन पुढे सरसावले होते आणि सगळ्यांना एका उत्तराची प्रतीक्षा होती. नेहमी शांत, संयमी आणि मोजक्या शब्दांत बोलणारे रजनीकांत यावेळी मात्र अत्यंत ठाम आणि स्पष्ट शब्दांत बोलले. त्यांनी संतापलेल्या स्वरात म्हटलं, “मी इतका नीच, हलकट माणूस नाही की कुणाच्या यशावरून मत्सर बाळगीन किंवा विनाकारण टिप्पणी करीन.” या एका वाक्याने त्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या सर्व अफवांचा अक्षरशः चुराडा करून टाकला.
हेही वाचा – राजकारणात मोठी खळबळ! बच्चू कडूंनी सांगितला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री
माझ्या आणि विजयच्या वयात तब्बल 25 वर्षांचं अंतर
रजनीकांत पुढे म्हणाले, “मी आता राजकारणात नाही. मग विजयचा हेवा का करावा? माझ्या आणि विजयच्या वयात तब्बल 25 वर्षांचं अंतर आहे. त्याच्याबद्दल मत्सर वाटण्याचं काहीच कारण नाही. उलट त्याने मिळवलेलं यश पाहून मला खूप आनंद झाला.” या शब्दांत केवळ स्पष्टीकरण नव्हतं, तर एका ज्येष्ठ सुपरस्टारकडून नव्या पिढीच्या नेत्याला दिलेली मनापासूनची दाद होती.
रजनीकांत यांनी विजयचं केलं भरभरून कौतुक
रजनीकांत यांनी विजय यांचं भरभरून कौतुक करत म्हटलं की, अवघ्या 52 व्या वर्षी त्यांनी तमिळनाडूच्या राजकारणात असा पराक्रम केला आहे, जो अनेक दिग्गजांना साधता आला नाही. एमजीआर आणि एनटीआर यांसारख्या दिग्गजांपेक्षाही मोठं यश विजय यांनी मिळवलं आहे, असं सांगत त्यांनी विजय यांची उंची किती वाढली आहे, याची जाणीव करून दिली. केंद्रातील भाजप आणि राज्यातील दोन बलाढ्य पक्षांविरोधात निवडणूक लढवून विजय मिळवणं हे अत्यंत उल्लेखनीय असल्याचं त्यांनी नमूद केलं. “विजय यांच्याकडून मला खूप अपेक्षा आहेत. त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा,” असं म्हणत त्यांनी विजय यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास व्यक्त केला.
विजय मुख्यमंत्री होताच त्यांचं अभिनंदन केलं
विजय मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन केलं नाही, या आरोपावरही रजनीकांत यांनी थेट उत्तर दिलं. “मी विजय मुख्यमंत्री होताच त्यांचं अभिनंदन केलं होतं,” असं सांगत त्यांनी गैरसमज दूर केला. विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला गैरहजर राहिल्याबाबत विचारलं असता त्यांनी नेहमीच्या शैलीत प्रतिप्रश्न केला, “मी याआधी कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला गेलो आहे का?” या एका प्रश्नातूनच त्यांनी टीकाकारांना आरसा दाखवला.
राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक संबंध कायम
निवडणुकीनंतर त्यांनी एम.के. स्टॅलिन यांची भेट घेतल्याबद्दलही राजकीय चर्चा रंगल्या होत्या. यावर त्यांनी स्पष्ट केलं की स्टॅलिन यांच्याशी त्यांची मैत्री ही राजकारणाच्या पलीकडची आहे. राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक संबंध कायम राहतात, हे त्यांनी अधोरेखित केलं. स्टॅलिन यांच्या पराभवाबद्दल आपल्याला दुःख झालं, असंही त्यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेदरम्यान रजनीकांत यांनी आणखी एक स्फोटक विधान केलं. “जर मी 2021 मध्ये निवडणूक लढवली असती, तर मी जिंकलो असतो.” या विधानाने पुन्हा एकदा तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात चर्चेचं वादळ निर्माण केलं. कारण आजही रजनीकांत यांची लोकप्रियता किती अफाट आहे, याची ही जाणीव करून देणारी प्रतिक्रिया होती.
तमिळनाडूच्या राजकारणात नवा अध्याय सुरू
एकीकडे विजय यांच्या नेतृत्वाखाली तमिळनाडूच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे, तर दुसरीकडे रजनीकांत यांनी त्यांच्या यशाचं मनापासून स्वागत करत सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. मत्सर नाही… कटुता नाही… उलट अपेक्षा, शुभेच्छा आणि एका ज्येष्ठ सुपरस्टारचा नव्या नेतृत्वावर असलेला विश्वास… हाच या संपूर्ण पत्रकार परिषदेचा खरा संदेश ठरला. आता या वक्तव्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. तमिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय यांचा उदय होत असताना, थलैवा रजनीकांत त्यांच्या पाठीशी शुभेच्छांसह उभे आहेत. आणि म्हणूनच, या दोन सुपरस्टार्समधील कथित मतभेदांच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.












