Natural Bleach At Home | आजकाल चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो मिळवण्यासाठी अनेकजण पार्लरमध्ये जाऊन केमिकलयुक्त ब्लीच करतात. मात्र, या केमिकल्समुळे काही वेळा त्वचेवर जळजळ, रॅशेस किंवा कोरडेपणा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अनेकजण आता घरगुती आणि नैसर्गिक उपायांकडे वळत आहेत. घरच्या घरी तयार केलेले नैसर्गिक ब्लीच त्वचेला कोणतेही नुकसान न करता चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यास मदत करते. चला तर मग आता आपण घरच्या घरी करता येणारे नैसर्गिक ब्लीच कोणते याबाबत जाणून घेऊया.
हेही वाचा – चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा आहे? मग वापरा दही-हळदीचा फेसपॅक, जाणून घ्या खास फायदे
दही आणि लिंबूचे ब्लीच – दोन चमचे दही, एक चमचा लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद एकत्र मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. दह्यामधील लॅक्टिक अॅसिड त्वचा स्वच्छ करण्यास मदत करते, तर लिंबू त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
टोमॅटो आणि मधाचा फेसपॅक – टोमॅटोचा रस आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा तजेलदार दिसते. टोमॅटो त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करतो, तर मध त्वचेला मॉइश्चर देतो.
बटाट्याचा रस आणि गुलाबपाणी ठरतो फायदेशीर – बटाट्याचा रस आणि गुलाबपाणी मिसळून चेहऱ्यावर लावल्यास डाग आणि पिग्मेंटेशन हलके होण्यास मदत मिळू शकते. तसेच त्वचेला थंडावा मिळतो.
नैसर्गिक ब्लीचचे फायदे कोणते?
नैसर्गिक ब्लीमुळे त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो. तसेच उन्हामुळे झालेले टॅनिंग कमी होण्यास मदत होते आणि त्वचा मऊ आणि फ्रेश दिसते. तसेच केमिकल्सचा दुष्परिणाम टाळता येतो आणि घरच्या घरी कमी खर्चात त्वचेची काळजी घेता येते. मात्र, कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वात आधी पॅच टेस्ट करा आणि मगच त्याचा वापर करा. तसेच जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर लिंबाचा वापर कमी प्रमाणात करावा.












