T2 Tigress Captured Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या चार निष्पाप महिलांवर हल्ला करून त्यांचा बळी घेणारी टी-2 वाघीण अखेर वनविभागाच्या ताब्यात आली आहे. या थरारक कारवाईमुळे गेल्या दोन दिवसांपासून भीतीच्या छायेत जगणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. जंगल परिसरात काम करणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दोन दिवसांपूर्वी सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात काही महिला नेहमीप्रमाणे तेंदूपाने गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र दबा धरून बसलेल्या वाघिणीने अचानक त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. एकाच वेळी चार महिलांचा बळी गेल्याने परिसरात शोककळा पसरली होती. मृत महिलांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वनविभागाने तातडीने मोठी शोधमोहीम हाती घेतली. पवनपार जंगल परिसरात ट्रॅप कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. वनअधिकारी, कर्मचारी आणि बेशुद्ध करणारे तज्ज्ञ पथक दिवस-रात्र जंगलात गस्त घालत होते. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वनविभागाला टी-2 वाघिणीचा ठावठिकाणा लागला.
सिंदेवाही तालुक्यातील पवनपार जंगल कक्ष क्रमांक 282 मध्ये ही वाघीण दिसून आल्यानंतर वनविभागाने नियोजनबद्ध कारवाई करत डार्ट गनच्या सहाय्याने तिला बेशुद्ध केले आणि सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात आले. या कारवाईदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली होती.
मात्र या वाघिणीसोबत असलेल्या बछड्यांबाबत अद्याप वनविभागाने स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये काही प्रमाणात चिंता कायम आहे. दरम्यान, हल्लेखोर वाघीण पकडण्यात आल्याने जंगलालगतच्या गावांमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून वनविभागाच्या तातडीच्या आणि धाडसी कारवाईचे कौतुक केले जात आहे.









