adulterated khoya seizure : धाराशिव जिल्ह्यात भेसळयुक्त अन्नपदार्थाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत कळंब तालुक्यातील येरमाळा येथुन तब्बल 215 किलो संशयित खवा जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यात भेसळीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी रोहित फंदी येरमाळा येथील सायली खवा ट्रेडिंग कंपनीवर छापा टाकला. या कारवाईत विक्री व वाहतुकीसाठी साठवून ठेवलेला अंदाजे 47 हजार 300 रुपयांचा 215 किलो खवा जप्त करण्यात आला.
या खव्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. विशेष म्हणजे, ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी आर.डी.फंदी, नमुना सहाय्यक आर.यू.शेंडगे यांच्या पथकाने सहाय्यक आयुक्त पी. एस. काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. अचानक झालेल्या या धाडीनंतर जिल्ह्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
टोल फ्री क्रमांक 1800 222 365 वर तक्रार नोंदवण्याचे आवाहन
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, अन्नपदार्थ खरेदी करताना नोंदणीकृत आस्थापनांमधूनच खरेदी करावी. तसेच खरेदीचे पक्के बिल घ्यावे. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास टोल फ्री क्रमांक 1800 222 365 वर तक्रार नोंदवावी. सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात बनावट व भेसळयुक्त खवा बाजारात येत असल्याने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासन आता अधिक सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.









