80 Lakh Women Declared Ineligible : लाडक्या बहिणींसाठी अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. ज्या लाडक्या बहिणांनी सरकारने ठरवून दिलेल्या वेळेत ई केवायसी केली नाही. त्या सर्व महिलांना प्रत्येक महिन्याला मिळणारे १५०० रुपये मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हा राज्यातील लाखो गरीब महिला वर्गासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पुढील काळात सरकार काही मुदत वाढवून देतंय का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ज्या लाडक्या बहिणांनी अद्याप सरकारने सांगितलेली ई-केवायसी केलेली नाही त्या सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाहीये. सरकारने त्याबाबतचा मोठा निर्णय घेतल्याचे समजतंय. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील तब्बल ८० लाख लाडक्या बहिणींना याचा मोठा फटका बसणार आहे. या महिला अपात्र ठरल्याने त्यांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहावं लागणार हे आता निश्चित मानले जात आहे.
सरकारी नोकरदार महिला आणि सधन महिलाही आढळून आल्या
गोरगरिब आणि वंचित कुटुंबातील महिलांना आर्थिक पाठबळ व्हावं आणि या महिलांना सन्मानाने जगता यावं यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती. सुरुवातीच्या काळात सरकारने ज्या ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज केला त्या सर्वांना आर्थिक लाभ दिला. पण यात काही सरकारी नोकरदार महिला आणि सधन महिलाही आढळून आल्यानंतर सरकराने छाननी सुरू केली. त्यात अनेक महिला अपात्र ठरल्या. त्यांना या योजनेतून वगळण्यात आलं.
गरजू महिलांना याचा मोठा फटाक बसण्याची शक्यता
सरकारने योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि केवळ गरजू महिलांनाच याचा लाभ घेता यावा यासाठी योजनेतील महिलांची ई केवायसी करण्याचे आवाहन केले होते. या ई केवायसी प्रक्रियेसाठी महिलांना वेळोवेळी मुदतवाढही दिली होती. आता सरकारने ३१ मार्चपर्यंतची शेवटची मुदत दिली होती. मात्र, तरीही लाखो महिला ईकेवायसी प्रक्रियेपासून वंचित राहिल्या आहेत. ग्रामीण आणि अतीदुर्गम तसेच डोंगराळ भागात तांत्रिक अडचणी आणि तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने या गरजू महिलांना याचा मोठा फटाक बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिलांना वगळण्याचा निर्णय
सरकारने ईकेवायसाठी मुदतवाढ देण्यास नकार दिला. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिलांना वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं असून त्यांना योजनेचा १५०० रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीला महिला लाभार्थ्यांची संख्या २.४६ कोटी इतकी होती. आता छाननी केल्यानंतर महिला लाभार्थ्यांची संख्या १.६६ कोटी इतकी झाली आहे.
केवायसी न केलेल्या महिला, सधन महिला, नोकरदार महिला आणि महिलांच्या नावाने लाभ घेणाऱ्या पुरुषांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळेच ही संख्या कमी झाली असल्याचा दावा सरकारच्या वतीने करण्यात येतंय. ज्या महिला पात्र ठरल्या आहेत, त्या गरीब आणि गरजू आहेत. काही महिलांना तर कमवण्याचा काहीच स्त्रोत नाहीये, त्यामुळे या सर्व महिलांपर्यंत आता हा लाभ मिळणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आलंय.












