IPL RCB Vs GT Final Match : आयपीएलचा थरार आता शिगेला पोहोचलाय! एकीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच RCB, तर दुसरीकडे गुजरात टायटन्स म्हणजे GT. दोन्ही संघ यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे हा सामना फक्त फायनलचा महामुकाबला नाही, तर दोन ताकदवान संघांमधील प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे आजची ट्रॉफी कोण जिंकणार… दोन्ही संघापैकी दुसऱ्यांदा ट्रॉफीवर कोणाचं नाव कोरलं जाणार आणि कोण कोणाला पराभवाची धुळ चारणार, कोणाचं पारडं जड आहे, हेड टू हेड माहिती घेऊ.
सुरुवात करूया फलंदाजीपासून…
RCB चा आधारस्तंभ म्हणजे विराट कोहली. विराट पुन्हा एकदा जुन्या अंदाजात दिसतोय. मोठ्या सामन्यात दबाव झेलण्याची ताकद त्याच्याकडे आहे. GT विरुद्ध त्याचा रेकॉर्डही जबरदस्त आहे. या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध GT सोबत त्याने 350 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याचा रेकाॅर्डही चांगला आहे. विराटसोबत फिल सॉल्ट, रजत पाटीदार आणि टीम डेविड यांसारखे फलंदाज RCB च्या फलंदाजीला आणखी चमक देतात. विशेष म्हणजे क्वालिफायरमध्ये रजत पाटीदारने अवघ्या 33 चेंडूत 93 धावांची तुफानी खेळी करून GT च्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात कोहली आपल्या अंदाजात खेळतोय की, पाटीदार एकहाती गेम फिरवतोय, का साई सुदर्शन आणि शुभमन गिल आरसीबीला भारी पडताय याची हेड टू हेड म
पण GT ची बॅटिंग लाईनअपही काही कमी नाही. शुभमन आणि साई सुदर्शन ही जोडी सध्या IPL मधील सर्वात घातक सलामी जोडी मानली जाते. गिलने 700 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत तर साई सुधर्शननेही 700 धावांचा टप्पा पार केला आहे. साई सुधर्शनचा फॉर्म तर इतका जबरदस्त आहे की अनेक तज्ज्ञ त्याला या IPL चा सर्वात सातत्यपूर्ण फलंदाज मानत आहेत. त्याने याआधी ऑरेंज कॅपही जिंकली आहे. फलंदाजीचा विचार केला तर GT कडे थोडी जास्त खोली दिसते. गिल, साई सुधर्शन, जोस बटलर यांच्याकडे सामना एकहाती फिरवण्याची ताकद आहे.
आता बोलूया गोलंदाजीचं….
इथे मात्र RCB थोडी वरचढ दिसते. कारण जोश हिझलवूड याने यंदा 22 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या वेगवान आणि अचूक गोलंदाजीसमोर मोठमोठे फलंदाजांनी गुडघे टेकलेत. त्याच्यासोबत भुवनेश्वर कुमार, यश दयाल आणि कृणाल पंड्या यांची आक्रमण गोलंदाजी आहे. विशेषतः पॉवरप्लेमध्ये विकेट्स घेण्याची क्षमता RCB कडे जास्त दिसते. क्वालिफायरमध्ये GT च्या टॉप ऑर्डरला त्यांनी पूर्णपणे लोळवलं होतं.
GT च्या गोलंदाजीत प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, रबाडा यांसारखी नावं आहेत. प्रसिद्ध कृष्णाने यंदा 25 विकेट्स घेतल्या आहेत आणि तो स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक ठरलाय. मात्र GT ची समस्या अशी आहे की, कधी कधी मधल्या षटकांमध्ये त्यांची गोलंदाजी महाग पडते. RCB सारख्या आक्रमक संघाविरुद्ध हीच गोष्ट महागात पडू शकते. दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला तर RCB थोडी पुढे आहे. दोघांमध्ये झालेल्या 9 सामन्यांपैकी RCB ने 5 तर GT ने 4 सामने जिंकले आहेत.
यंदाच्या हंगामातही दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी टक्कर दिली आहे. काही सामन्यांत GT ने बाजी मारली तर काही ठिकाणी RCB ने आपली ताकद दाखवली. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्वालिफायर-1 मध्ये RCB ने GT ला तब्बल 92 धावांनी हरवलं. त्यामुळे मानसिक आघाडी सध्या RCB कडे आहे.
आता आजच्या सामन्यात काय घडू शकतं ते पाहू…
जर विराट कोहली आणि फिल सॉल्टने पॉवरप्लेमध्ये चांगली सुरुवात केली तर RCB 200+ धावांचा डोंगर उभा करू शकते. दुसरीकडे GT साठी गिल आणि साई सुधर्शनची सुरुवातीची भागीदारी खूप महत्त्वाची असेल. हे दोघे 10-12 षटकं टिकले तर सामना GT च्या बाजूला झुकू शकतो. अहमदाबादची खेळपट्टी साधारणपणे फलंदाजांना मदत करणारी असते. त्यामुळे मोठा स्कोअर पाहायला मिळू शकतो. 190 ते 220 धावांदरम्यानची लढत होण्याची शक्यता आहे. फॉर्मच्या बाबतीत पाहिलं तर विराट कोहली, साई सुधर्शन, शुभमन गिल, रजत पाटीदार, जोश हेझलवूड आणि प्रसिद्ध कृष्णा हे सध्या सर्वाधिक प्रभावी खेळाडू दिसत आहेत.
जर सामना पूर्णपणे फलंदाजीवर गेला तर GT चं पारडं जड वाटतं. पण जर गोलंदाजांनी प्रभाव टाकला, सुरुवातीला विकेट्स पडल्या आणि दबाव वाढला तर RCB पुढे जाऊ शकते. म्हणून हा सामना अगदी 50-50 वाटत असला तरी सध्याच्या फॉर्म, क्वालिफायरमधील विजय आणि मजबूत गोलंदाजीमुळे RCB ला थोडीशी आघाडी देता येईल. मात्र GT कडे गिल आणि साई सुधर्शनसारखे गेम चेंजर आहेत, जे एका तासात संपूर्ण चित्र बदलू शकतात. क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र एक गोष्ट नक्की… आज चौकार, षटकार, विकेट्स आणि शेवटच्या षटकापर्यंत चालणारा जबरदस्त थरार पाहायला मिळणार!












