Navi Mumbai Inflation Protest: नवी मुंबईत महागाईविरोधात संताप व्यक्त करत नागरिक आणि कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. वाढत्या दरांचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी थेट रस्त्यावर चूल पेटवून स्वयंपाक केला आणि सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाले आहे. रोजच्या गरजेच्या वस्तूंचे दरही वाढल्याने घरखर्चाचा ताळमेळ बसवणे अवघड झाले आहे. याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, महागाईमुळे सामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसच्या वाढत्या दरांमुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच प्रतीकात्मक निषेध म्हणून रस्त्यावर चूल पेटवून स्वयंपाक करण्यात आला.
रोहित पवार म्हणाले की, पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत असून लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. हा रोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार आहे.
झोपलेल्या सरकारला जागं करायचं असेल, तर मोठं पाऊल उचलावं लागतं,” असे म्हणत. या आंदोलनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला.
हेही वाचा: मोठा निर्णय! शेतकरी कर्जमाफीसाठी नवे निकष जाहीर; ‘या’ पदाधिकाऱ्यांना लाभ नाही
देशात अघोषित आणीबाणी
देशातील परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी “देशात अघोषित आणीबाणी असल्यासारखी स्थिती आहे,”असा आरोप केला. तसेच सरकारच्या धोरणांवर टीका करताना शेतकरी कर्जमाफीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप
सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप करत. त्यामध्ये अनेक अटी घालण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.”कर्जमाफीसाठी सरकारची नियत चांगली असावी लागेल. आम्ही पूर्वी अतिशिवाय कर्जमाफी दिली होती,” असे तर म्हणाले. सध्या सरकार बँकांची वसुली करण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महिलांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली
महिलांच्या सुरक्षेबाबतही त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. अनेक प्रकरणांमध्ये चार्जशीट दाखल होत नसल्याचे सांगत, गृहविभाग सक्षम व्यक्तीकडे द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप करत त्यांनी बिहारपेक्षाही वाईट परिस्थिती असल्याचे विधान केले.
भ्रष्टाचारावरही त्यांनी टीका
प्रशासनातील भ्रष्टाचारावरही त्यांनी टीका केली. प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात, तर ‘हफ्ता’ देणारे टिकून राहतात, असा आरोप त्यांनी केला. डान्सबारपासून ते विविध क्षेत्रांतून हा पैसा वरपर्यंत जात असल्याचेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, काही नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी, “नेते एक सांगतात आणि स्वतः वेगळं वागतात,” असे म्हणत दुहेरी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
एकूणच, महागाई, शेतकरी प्रश्न, कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासनातील कथित गैरप्रकार या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न या आंदोलनातून केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.












