Congress Leads Massive Fuel Price Protest in Nagpur: पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन करताना पोलिसांकडून अनेक आंदोलक ताब्यात घेतले आहे.
नागपुरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींविरोधात काँग्रेस पक्षाने जोरदार आंदोलन छेडले. इंधन दरवाढ तात्काळ मागे घ्यावी या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आंदोलनामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा: चाहत्यांना धक्का! मंगळवेढ्यातील प्रसिद्ध रिलस्टारनी स्वतःच्या हॉटेलमध्ये केली आत्महत्या
हातात पक्षाचे झेंडे घेऊन घोषणाबाजी
हातात पक्षाचे झेंडे आणि घोषणाबाजी करत मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स उभारले होते. मात्र कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडत आकाशवाणी चौकापर्यंत धडक दिली. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
काही कार्यकर्ते पेट्रोलच्या टाक्या हातात घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून महागाईत आणखी भर पडत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ इंधन दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना सन्मान लॉज परिसरात अडवण्याचा प्रयत्न केला. तरीही आंदोलकांनी पोलिसांना न जुमानता पुढे जाण्याचा प्रयत्न केला.
सध्याची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.












